धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा थरारक व्हिडिओ व्हायरल – गिरणा नदीत उतरून वाळू चोरांवर कारवाईचा प्रयत्न

बातमी शेअर करा...

धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचा थरारक व्हिडिओ व्हायरल – गिरणा नदीत उतरून वाळू चोरांवर कारवाईचा प्रयत्न

जळगाव : जिल्ह्यात वाळू माफियांची बिनधास्त दादागिरी सुरू असतानाच धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष नदी पात्रात उतरून वाळू चोरांवर कारवाईचा प्रयत्न केल्याचा थरारक प्रसंग समोर आला आहे. त्यांच्या धाडसी कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

२४ जुलै रोजी जळगावहून धरणगावकडे जात असताना बांभोरी पुलाजवळ गिरणा नदी पात्रात सुरू असलेला अवैध वाळू उपसा आणि ट्रॅक्टरद्वारे वाहतूक तहसीलदार सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी कोणतीही वेळ न दवडता थेट नदी पात्रात उतरून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काही अंतर पोहत जाऊन वाहनांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या अधिकृत ओळखीची जाणीव होताच वाळू चोरांनी वाहनांसह तिथून पलायन केले.

तहसीलदार सूर्यवंशी यांचा जीव धोक्यात घालून केलेला हा थेट हस्तक्षेप नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या धाडसी भूमिकेमुळे अवैध वाळू उपशावर प्रशासनाचे लक्ष किती तीव्र आहे, हे स्पष्ट झाले आहे.

जरी त्या क्षणी चोरटे पळून गेले असले, तरी या प्रकारामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात वाढत चाललेली वाळू माफियांची निर्ढावलेली मानसिकता आणि प्रशासनाच्या कारवाईच्या मर्यादा यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

व्हिडिओच्या आधारे तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने अशा प्रकारच्या कारवायांना आणखी बळ देणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम