धरणगाव नगरपरिषदेची हरित क्रांती – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रोपवाटिका व बीज संकलन केंद्राचे उद्घाटन

बातमी शेअर करा...

धरणगाव नगरपरिषदेची हरित क्रांती – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रोपवाटिका व बीज संकलन केंद्राचे उद्घाटन

▪️ धरणगाव नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम; पर्यावरण संवर्धनासाठी १५ हजार रोपांची तयारी

जळगाव,) –
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेतून ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत धरणगाव नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या रोपवाटिका व बीज संकलन केंद्राचे उद्घाटन आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या रोपवाटिकेची एकूण २० हजार रोपांची क्षमता असून, यामध्ये निंब (४ हजार), चिंच (१.५ हजार), बांबू (१.५ हजार), करंज (२.५ हजार), जांभूळ (२ हजार), आंबा (२ हजार), गुलमोहर (५००), पापडी (२ हजार) अशा एकूण १५ हजार रोपांची यशस्वी निर्मिती करण्यात आली आहे. ही सर्व रोपे येत्या पावसाळ्यात नागरिकांना वृक्षारोपणासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याच ठिकाणी बीज संकलन केंद्र देखील कार्यान्वित करण्यात आले असून, शहरातील विविध भागांतून संकलित केलेले आंबा, चिंच, जांभूळ, करंज, निंब आदींच्या बिया येथे साठवून त्यांचे जतन व संवर्धन केले जात आहे. नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या घरात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या बीया नगरपरिषदेच्या संकलन केंद्रात आणून द्याव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात चुडामण मराठे यांचा रोपवाटिका उभारणीत विशेष योगदान दिल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी “एक लहान नगरपरिषद स्वतःची रोपवाटिका आणि बीज संकलन केंद्र सुरू करते, यापेक्षा मोठे यश नाही. हे धरणगावचे ‘हरित यश’ आहे. ही फक्त सुरुवात असून, यासाठी नागरिक आणि विद्यार्थी यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे,” असे भावनिक प्रतिपादन केले.

धरणगाव नगरपरिषदेचा हा उपक्रम इतर लहान नगरपरिषदांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. यामुळे शहराच्या हरित पट्ट्याचे प्रमाण वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही नवी दिशा मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याधिकारी श्री. झंवर यांनी केले. याप्रसंगी नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी, स्थानिक नगरसेवक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम