
धरणगाव पालिकेत पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्याला हादरा
धरणगाव पालिकेत पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्याला हादरा
महाविकास आघाडीचे वर्चस्व
जळगाव / धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव नगरपालिका निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या धरणगाव नगरपालिकेत महाविकास आघाडी प्रणित शहर विकास आघाडीने सत्ता हस्तगत करत निर्णायक विजय मिळविला आहे.
नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या लिलाबाई सुरेश चौधरी यांनी तब्बल २ हजार ४४७ मतांची स्पष्ट आघाडी घेत विजय संपादन केला. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या शिंदे गटाच्या उमेदवार वैशाली भावे यांना पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे धरणगावमध्ये शिंदेसेनेच्या वर्चस्वाला मोठा हादरा बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थानिक तहसील कार्यालयात सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. प्रत्येक फेरीनंतर महाविकास आघाडीची आघाडी वाढत गेल्याने निकालाबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट झाले. धरणगाव नगरपरिषदेत एकूण ११ प्रभाग असून नगराध्यक्षपदासह २३ नगरसेवक अशा २४ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.
या निकालाने केवळ स्थानिक राजकारणातच नव्हे तर जिल्हास्तरीय राजकीय वातावरणातही खळबळ उडवली असून महाविकास आघाडीने मंत्र्यांच्या होमपीचवर विजय मिळवल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम