
धानोरा येथे विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
गावात शोककळा
धानोरा (ता. चोपडा) प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील धानोरा येथे शुक्रवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. शेतात गुरांसाठी चारा घेऊन परतणाऱ्या अनिल भिला कोळी (वय २७) या तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
अनिल कोळी हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीकामातून करीत होते. दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, ते जनावरांसाठी चारा घेऊन शेतातून घरी परतत असताना अचानक एका विद्युत वायरचा स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विद्युत शॉक बसला. यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी त्यांच्या सोबत एक लहान बालक देखील होते. ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेतली आणि अनिल यांना प्रथम धानोरा उपकेंद्रात, नंतर जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे कोळी कुटुंबीयांमध्ये शोकाचे वातावरण असून, रुग्णालयात उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. मयत अनिल कोळी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.
घटनेची नोंद जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम