
नगरदेवळा जि.प.उर्दू शाळेत अब्दुल कलाम दिन आणि वाचन प्रेरणा दिवस साजरा
नगरदेवळा जि.प.उर्दू शाळेत अब्दुल कलाम दिन आणि वाचन प्रेरणा दिवस साजरा
पाचोरा प्रतिनिधी
जिल्हा परिषद उर्दू शाळा, नगरदेवळा ता.पाचोरा येथे बुधवार रोजी मिसाईल मॅन आणि भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण आणि नबी (स.अ.व.) च्या स्तुतीने (नात पाक) झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोराड खेडा उर्दू केंद्रप्रमुख अब्दुल कदीर उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम शेख, उपाध्यक्ष अफरोज शेख, वाजिद शेख आणि अशफाक मजीद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावर भाषणे सादर केली. कार्यक्रमाचा उद्देश सांगताना शेख जावेद रहीम यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सेवा, त्याग, भारतीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाला शिखरावर नेणे, अग्नी क्षेपणास्त्र, पृथ्वी क्षेपणास्त्र, अणुऊर्जा, संरक्षण शक्ती, अंतराळ संशोधनातील अब्दुल कलाम यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
अशफाक मजीद यांनी दिवसाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांना आवाहन केले की, त्यांनीही अब्दुल कलाम यांच्या जीवनाला आदर्श मानून उच्च ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. केंद्रप्रमुख शेख अब्दुल कदीर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अब्दुल कलाम यांच्या यशात पालकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला, तसेच शेख अब्दुल कादिर जिलानी (र.अ.), कुतुबुद्दीन बख्तियार काकी (र.अ.), बाबा फरीद-उद्दीन गंज शकर (र.अ.) यांच्या जीवनाची उदाहरणे देऊन पालकांना मुलांच्या प्रशिक्षणाच्या (तरबियत) संदर्भात त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांनी मुलांच्या मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक प्रशिक्षणात पालकांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला.
सध्याच्या काळात मुलींच्या संरक्षणासंबंधी महत्त्वाच्या उपाययोजना सांगितल्या. मुलांच्या शैक्षणिक प्रवासासाठी पालकांना आवाहन केले की, त्यांनी भीती आणि दबावापासून दूर राहून मुलांच्या प्रगतीसाठी मैत्रीपूर्ण, स्वतंत्र आणि आनंदाई वातावरण निर्माण करावे. याच दिवशी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेत मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत शक्य ती सर्व मदत करण्याचे आणि जागृत पालक म्हणून भूमिका बजावण्याचे ध्येय घेतले. कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेख अन्सार, मोहसिन शेख, मुश्ताक खान, उमर बेग, नासिर मनियार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अजहर शेख, खलील शेख, रिजवान शेख, नविदा बानो, सना अन्सारी, सय्यद दिलारा यांनी प्रयत्न केले. शाळेच्या वतीने सर्व मुलांना दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी गृहपाठही देण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम