
नगरसेवकपदासाठी १५५५ आणि नगराध्यक्षपदासाठी ७७ उमेदवार रिंगणात
जळगाव जिल्ह्यातील सोळा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये माघारीच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या मोठ्या हालचाली झाल्या असून संपूर्ण जिल्ह्यातील निवडणूक लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नगरसेवकपदासाठीच्या ५८२ तर नगराध्यक्षपदासाठीच्या ५४ उमेदवारांनी माघार घेतल्याने स्पर्धा अधिक संक्षिप्त आणि सरळ झाली आहे. आता नगरसेवक पदासाठी १५५५ आणि नगराध्यक्ष पदासाठी ७७ उमेदवार मैदानात राहिले आहेत.
जिल्ह्यातील भुसावळ आणि वरणगाव येथे नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी आठ उमेदवार असल्याने या ठिकाणी चुरशीच्या लढतीची चिन्हे आहेत. दुसरीकडे मुक्ताईनगर आणि पाचोरा येथे सरळ लढत होणार असल्याने मतदारांचे लक्ष या दोन नगरांवर केंद्रीत झाले आहे. भुसावळ ‘अ’ वर्ग, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर आणि पाचोरा ‘ब’ वर्ग तर यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, सावदा, रावेर, एरंडोल आणि फैजपूर या ‘क’ वर्ग नगरपरिषद म्हणून ओळखल्या जातात. शेंदूर्णी आणि मुक्ताईनगर या दोन नगरपंचायतींसह जिल्ह्यात एकूण २४६ प्रभागांतून ४६४ नगरसेवक पदांसाठी निवडणूक होत आहे.
माघारीसाठी सुरुवातीपासूनच पक्षांतर्गत मनधरणी वेगात सुरू होती. शेवटच्या दिवशी धरणगाव येथे तब्बल १०० उमेदवारांनी माघार घेतल्याने स्थानिक राजकीय हालचालींना वेग आला. भुसावळ येथे माघारीनंतर सर्वाधिक २५५ उमेदवार रिंगणात राहिल्याने तेथील स्पर्धा अधिक रंगणार आहे. विशेष म्हणजे जामनेर येथे नगराध्यक्षपदासाठीच्या चार पैकी तीन उमेदवारांनी २० तारखेला माघार घेतल्याने नगराध्यक्षपदाची बिनविरोध निवड सुनिश्चित झाली आहे. दिवसभर उमेदवार, कार्यकर्ते आणि पक्षनेत्यांच्या घडामोडींनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते.
निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी २६ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. प्रचारासाठी ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच परवानगी असेल, तर सभा आणि मोर्चांसाठी रात्री दहा वाजेपर्यंतच अनुमती मिळणार आहे. दोन डिसेंबर रोजी ९७७ मतदान केंद्रांवर जिल्ह्यातील ८ लाख ८९ हजार ९१४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी आणि निकाल तीन डिसेंबर रोजी जाहीर होणार असून या निकालातून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम