
नदीमध्ये पाय घसरून पडल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
नदीमध्ये पाय घसरून पडल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
पाचोरा प्रतिनिधी बहुळा नदी पात्रात पाय घसरून पडल्याने एका २० वर्षीय तरुण मजुराचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील वेरुळी गावानजीक २९ आॅक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनिल उखा बारेला (वय – २० वर्ष) रा. विरवाडे ता. चोपडा असे मृत तरुणाचे नाव असून तो पहाण ता. पाचोरा येथील शेतकऱ्याकडे शेत मजुरीसाठी आला होता. २९ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सुनिल बारेला हा वेरुळी ता. पाचोरा येथे गेला होता. दरम्यान वेरुळी गावानजीक असलेल्या बहुळा नदी पात्रातुन जात असताना सुनिल बारेला याचा अचानक पाय घसरला व तो खोल पाण्यात वाहुन गेला. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी शोधा शोध सुरु केली मात्र बहुळा धरणाचे गेट उघडलेले असल्याने पाण्याचा फ्लो जास्त होता. यामुळे शोध कार्यात अडचण येत होती. बहुळा धरणाचे गेट काही वेळ बंद करण्यात आले होते. त्यानंतर काही अंतरावर सुनिल बारेला याचा मृतदेह आढळुन आला. सुनिल बारेला याचा मृतदेह जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो. नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काॅ. मनोहर पाटील हे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम