नर्व्ह बायोप्सी”अर्थात मज्जातंतूच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आशेचा किरण

बातमी शेअर करा...

“नर्व्ह बायोप्सी”अर्थात मज्जातंतूच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आशेचा किरण

महादेव रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाची ऐतिहासिक कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटल येथे ५५ वर्षीय रुग्णाला मज्जातंतूंच्या दुर्मिळ विकारामुळे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले असताना दिलासा मिळाला आहे. महादेव रुग्णालयाचे तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी केलेल्या अत्याधुनिक मज्जातंतूच्या “नर्व्ह बायोप्सी शस्त्रक्रिये”मुळे त्यांच्या आजाराचे अचूक निदान शक्य झाले. यामुळे योग्य उपचार सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

५५ वर्षीय रमेशभाई (बदललेले नाव) यांना गेली अनेक महिने हातपायांमध्ये सुन्नपणा, जळजळ आणि अशक्तपणा यांनी त्रस्त होते. अनेक तपासण्या आणि उपचारांनंतरही त्यांच्या आजाराचे नेमके कारण समजू शकले नव्हते. मज्जातंतूंच्या दुर्मिळ विकारामुळे त्यांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले होते. महादेव रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख आणि तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी रुग्णालयातील पहिली नर्व्ह बायोप्सी (मज्जातंतू ऊती तपासणी) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. डॉ. तायडे यांच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवाने, तांत्रिक कौशल्याने आणि अत्याधुनिक ज्ञानामुळे ही गुंतागुंतीची प्रक्रिया अत्यंत अचूकतेने आणि सुरक्षिततेने पार पडली.

नर्व्ह बायोप्सी म्हणजे काय ?
नर्व्ह बायोप्सी ही एक अत्यंत नाजूक आणि विशेष निदान प्रक्रिया आहे. ज्यामध्ये मज्जातंतूचा एक छोटासा भाग अत्यंत काळजीपूर्वक सूक्ष्मदर्शकाखाली तपासणीसाठी काढला जातो. या प्रक्रियेसाठी उच्च तांत्रिक कौशल्य, सूक्ष्म शस्त्रक्रिया ज्ञान आणि न्यूरोलॉजीचे सखोल ज्ञान आवश्यक असते. हे परीक्षण विशेषतः जेव्हा इतर तपासण्यांनंतरही रोगाचे नेमके निदान होऊ शकत नाही, तेव्हा केले जाते.

विभागप्रमुख डॉ. तायडे यांनी सांगितले, “आजची यशस्वी नर्व्ह बायोप्सी आमच्या न्यूरोलॉजी विभागासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या अत्याधुनिक निदान सुविधेमुळे आता गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ मज्जातंतू विकारांचे अचूक निदान आणि प्रभावी उपचार या भागातच उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना आता मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही.” महादेव हॉस्पिटल येथे या सुविधेमुळे अनेक फायदे रुग्णांना मिळाले आहे. गुंतागुंतीच्या मज्जातंतू विकारांचे अचूक निदान, योग्य आणि लक्ष्यित उपचार, रुग्णांची मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज टळणे, वेळेची आणि खर्चाची बचत, प्रादेशिक पातळीवर उच्च दर्जाच्या न्यूरोलॉजी सेवा जळगाव शहरात प्राप्त झाली आहे.

उपचार घेणारे रमेशभाई म्हणाले, “मी अनेक महिन्यांपासून त्रासलो होतो. अनेक डॉक्टरांकडे गेलो, परंतु माझ्या समस्येचे नेमके निदान होत नव्हते. आता या बायोप्सीमुळे माझ्या आजाराचे अचूक कारण समजले आहे आणि मला योग्य उपचार मिळत आहेत. मी आभारी आहे.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम