नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे, शुद्धीतच… ‘दारू नको, दूध प्या’चा संदेश देत जनप्रबोधन

बातमी शेअर करा...

नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे, शुद्धीतच… ‘दारू नको, दूध प्या’चा संदेश देत जनप्रबोधन

जळगाव (प्रतिनिधी): नवीन वर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे तर शुद्धीत, धाब्यावर नव्हे तर कुटुंबासोबत घरीच करावे, असा सामाजिक संदेश देत जळगावात यंदाही नववर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य, जळगाव जिल्हा टाटा मॅजिक टॅक्सी परवानाधारक चालक-मालक संघटना आणि दिशा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेले हे जनप्रबोधनात्मक अभियान यंदाही ३१ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले.

सालाबादप्रमाणे टाटा-मॅजिक वाहनांवर प्रबोधनात्मक बॅनर लावून टॅक्सी चालक, प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. सकाळी ११ वाजता पांडुरंग टॉकीज चौकात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदारजी बारबोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव चंद्रकांत चौधरी, कार्याध्यक्ष दिनेश भंगाळे, उपाध्यक्ष धनराज सोनवणे उपस्थित होते. बॅनर वाहनांवर लावून जनप्रबोधन मोहिमेची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी येणाऱ्या नवीन वर्षात दारू किंवा कोणतेही व्यसन न करण्याचा संकल्प केला. “दारू नको, दूध प्या” असा ठाम संदेश देत व्यसनमुक्त जीवनाचा आग्रह धरण्यात आला. प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी केदारजी बारबोले यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शहरात वाहतूक नियमांचे पालन व्हावे व नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

संघटनेतर्फे दिनेश भंगाळे यांनी प्रबोधनात्मक विचार मांडले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज सोनवणे, लक्ष्मण चौधरी, प्रकाश कोळी, चंदू पाटील, लक्ष्मण भोळे, कपिल चौधरी, जगदीश खैराडे, प्रदीप चौधरी, संतोष भोई, गजानन हेंडे, दीपक सोनवणे, बबलू सुतार, जयराज सोनवणे, अनिल चौधरी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल संकेत झांबरे यांची उपस्थिती लाभली.

नववर्षाच्या स्वागताला सामाजिक भानाची जोड देत, व्यसनमुक्तीचा संदेश देणारे हे अभियान जळगावकरांच्या विशेष चर्चेचा विषय ठरले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम