
नशिराबादजवळ मातेची चिमुकलीसह रेल्वेखाली आत्महत्या ; परिसरात हळहळ
नशिराबादजवळ मातेची चिमुकलीसह रेल्वेखाली आत्महत्या ; परिसरात हळहळ
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद परिसरात सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) रात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण गाव हादरले. कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या सहा वर्षीय मुलीसह धावत्या रेल्वेखाली झोपून घेऊन जीवनयात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेत दोन निरपराध जीवांचा बळी गेला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये मनीषा चंद्रकांत कावळे (वय २८) आणि त्यांची मुलगी गौरी (वय ६) यांचा समावेश आहे. दोघींनी भादली रेल्वे पुलाजवळ हा टोकाचा निर्णय घेतला. माहिती मिळताच नशिराबाद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
मनीषा कावळे आपल्या पती चंद्रकांत आणि दोन मुलींंसोबत भवानीनगरात राहत होत्या. चंद्रकांत हे एमआयडीसीतील एका चटई कंपनीत नोकरीला आहेत. सोमवारी दुपारी मनीषा यांनी रेशनचा तांदूळ आणण्याचे कारण सांगत धाकटी मुलगी गौरीसोबत घराबाहेर पाऊल टाकले, मात्र त्या पुन्हा परतल्या नाहीत. संध्याकाळी त्यांचा पत्ता लागत नसल्याने चंद्रकांत यांनी शोधाशोध सुरू केली. त्याच वेळी, रेल्वेखाली एका महिलेसह बालिकेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली .
प्राथमिक तपासानुसार, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, नेमके कारण समजण्यासाठी अधिक तपास सुरू आहे. या घटनेने नशिराबाद गावात शोककळा पसरली असून कावळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम