नशिराबादमध्ये बांधकाम सुरू असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

बातमी शेअर करा...

नशिराबादमध्ये बांधकाम सुरू असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

जळगाव: जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली असून, यामुळे मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मृत तरुणाचे नाव सादिक मेहमूद पिंजारी (वय ३५, रा. नशिराबाद) असे आहे. सादिक मिस्त्रीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता तो नशिराबाद येथील भवानी नगर परिसरात एका बांधकामावर काम करत असताना अचानक दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.

स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला.

सादिकच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सादिकच्या मृत्यूमुळे संपूर्ण नशिराबाद गावात शोककळा पसरली आहे.

या घटनेची नोंद नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना केल्या जातात की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम