नागपूरच्या वकिलाला १२ कोटी २० लाखांचा गंडा

बातमी शेअर करा...

नागपूरच्या वकिलाला १२ कोटी २० लाखांचा गंडा

सहा संचालकांविरुद्ध जळगावात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी धरमपेठ, नागपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जुगलकिशोर टिकमचंद गिल्डा (वय ६५) आणि त्यांच्या कुटुंबियांची तब्बल १२ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २८ महिन्यात दाम दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रामदेवबाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीच्या सहा संचालकांनी २००६ ते २०२१ या कालावधीत गुंतवणूक करून घेतली. मात्र परतावा न मिळाल्याने तक्रारदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावताच २८ नोव्हेंबर रोजी जिल्हा पेठ पोलिसांनी सहा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तक्रारदार गिल्डा यांची नातेवाईकांमार्फत कंपनीच्या संचालकांशी ओळख झाली. संचालक शारदादेवी चांडक यांनी ‘२८ महिन्यात दुप्पट रक्कम’ मिळेल असे आश्वासन देत गुंतवणुकीस प्रवृत्त केले. कंपनी विविध शहरांत टाउनशिप, प्लॉट व फ्लॅट प्रकल्प राबवते, मोठा नफा देत असल्याचे सांगण्यात आले. त्या आमिषाला भुलून गिल्डा कुटुंबियांसह नातेवाईकांनी मोठी गुंतवणूक केली.

२००९ मध्ये दिलेली ८० लाखांची गुंतवणूक २०११ मध्ये १ कोटी ६० लाख झाली असल्याचे कळताच, तक्रारदारांनी ती रक्कम काढण्याऐवजी पुन्हा २८ महिन्यांसाठी गुंतविली. कंपनीने त्यासाठी लेखी आश्वासने व धनादेश दिले.

रक्कम देणे टाळत कंपनीने त्यांना मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जमीन दाखविली. मात्र त्या जमिनी वादग्रस्त असल्याचे उघड झाले. अखेर जळगावातील मुक्ताईनगर शिवारातील जागा दाखविली; पण नगररचनाकारांकडून ती जागा रहिवासी विकासासाठी अनुपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले.

गुंतवणुकीबरोबरच गिल्डा यांनी स्वतःची मालमत्ता विकून मिळालेले ५० लाख रुपयेही कंपनीला दिले. २०१३ मध्ये त्यांनी संपूर्ण रक्कम मागितली असता टाळाटाळ सुरू झाली. अखेर १७ लाख ५० हजारांचा एकच धनादेश देण्यात आला.

परतावा न मिळाल्याने अॅड. गिल्डा यांनी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी कंपनीचे संचालक —
गोपाल हरिकिसन चांडक (४२), मोहन हरिकिसन चांडक (३८), शारदादेवी हरिकिसन चांडक (६०), गणेश विठ्ठलदास चांडक (५८), शिल्पा गोपाल चांडक आणि सुजाता मोहन चांडक (सर्व रा. आर्वी, जि. वर्धा)
यांच्यावर गुन्हा दाखल केला.हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक आशीष लवंगळे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम