
नागपूर-मडगांव विशेष रेल्वेला तृतीय साप्ताहिक दर्जा व अतिरिक्त थांब्यांची मागणी
नागपूर-मडगांव विशेष रेल्वेला तृतीय साप्ताहिक दर्जा व अतिरिक्त थांब्यांची मागणी
नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने सुरू केलेली विशेष गाडी क्र. ०११३९/४० नागपूर-मडगांव द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेस कायमस्वरूपी तृतीय साप्ताहिक करण्यात यावी, तसेच चांदुर, मूर्तीजापूर, नांदुरा, बोदवड, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड व पेण येथे अतिरिक्त थांबे सुरू करण्यात यावेत, अशी मागणी विदर्भ-खान्देश-कोकण प्रवासी व शेतकरी वर्गाने केली आहे.
ही मागणी कल्याण सावंतवाडी (रजि.) संस्थेचे रेल्वे प्रवासी सामाजिक कार्यकर्ते व मध्य कोकण रेल्वे अभ्यासक श्री. वैभव बहुतूले यांनी केंद्रीय मंत्री व खासदारांना लेखी निवेदनाद्वारे केली. त्यांनी स्पष्ट केले की, या रेल्वेमुळे विदर्भ व खान्देशातील संत्री, सीताफळ, केळी, लाल मिरची, द्राक्ष, डाळिंब, तर कोकणातील हापूस आंबा, काजू, आंबापोळी, फणसपोळी, खाजा यांसह विविध फळ-फुल-शेतीमालाच्या वाहतुकीला चालना मिळेल. त्यामुळे स्थानिक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय बेरोजगार युवक-युवतींनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
निवेदनात चंद्रपूरचे महाकाली मंदिर, वर्ध्याचे सेवाग्राम आश्रम, नागपूरचे दीक्षाभूमी, शेगावचे गजानन महाराज मंदिर, सिंधखेडराजाचे माँ जिजाऊ जन्मस्थान, नांदुराचे १०५ फूट हनुमान मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर तसेच कोकणातील कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आदी धार्मिक स्थळांना जोडणारी ही सेवा सुरू झाल्यास भाविकांना मोठा लाभ होईल, असेही नमूद केले आहे.
या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. सोमण्णा, रवनीत सिंग बिट्टू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वे बोर्ड अध्यक्ष, तसेच मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक व विभागीय व्यवस्थापकांना पाठवण्यात आले आहे.
रेल्वे तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी सुरू करून अतिरिक्त थांबे देण्यात आल्यास मध्य रेल्वेला मोठ्या प्रमाणात राजस्व प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम