नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांमधून सोन्याच्या अंगठ्या लांबविणारी महिला जेरबंद

बातमी शेअर करा...

नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांमधून सोन्याच्या अंगठ्या लांबविणारी महिला जेरबंद

शनिपेठ पोलिसांनी बरेलीहून केली अटक ; ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव प्रतिनिधी शहरातील आर.सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या नामांकित सुवर्णपेढ्यांमधून तब्बल ४.७० लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने लंपास करणारी लकी शिवशक्ती शर्मा (३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) ही अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. युट्यूबवरील क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया यांसारख्या मालिकांमधून चोरी करण्याचे धडे गिरवून ती मागील दहा वर्षांपासून विविध राज्यांमध्ये सोन्याच्या दुकानांना लक्ष्य करीत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

ऑक्टोबर महिन्यात जळगाव शहरातील सुवर्णपेढ्यांमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या चोरीच्या घटनांनंतर जिल्हापेठ आणि शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला महिलेचा स्पष्ट चेहरा पोलिसांसाठी महत्त्वाचा ठसा ठरला. तांत्रिक तपासाच्या आधारे ती उत्तरप्रदेशातील बरेली येथील असल्याचे निष्पन्न झाल्यावर निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रदीप नन्नवरे, वैशाली पावरा व निलेश घुगे यांच्या पथकाने बरेली येथे छापा टाकत तिला जेरबंद केले.तिच्याकडून ६ लाखांहून अधिक किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहे.

चोरीपूर्वी सोन्याच्या शोरूम्सची लोकेशन शोधण्यासाठी गुगल मॅपचा आणि चोरीच्या पद्धतींसाठी युट्यूब व्हिडीओंचा वापर करणारी ही महिला संगठितपणे काम करीत असे. दुकानात गेल्यावर अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने ती ग्राहकांचे लक्ष विचलित करून खरी अंगठी बनावट अंगठीशी अदलूनखदलून गुपचूप खिशात ठेवत असे. बनावट अंगठ्यांवर लावण्यासाठी तिने विविध दागिन्यांची जुनी लेबले, क्यूआर टॅगही चोरून ठेवले होते, हे तपासात पुढे आले.

जळगावातील गुन्ह्यांनंतर ती थेट नागपूरला गेली आणि खंडेलवाल ज्वेलर्स व लोंदे ज्वेलर्सना लक्ष्य केले. मात्र जळगाव सराफ असोसिएशनने राज्यभर पाठविलेल्या सावधानतेमुळे नागपूरमधील सराफ सतर्क झाले. तिने अंगठ्या चोरण्याचा प्रयत्न करताच तिच्या हालचालींवर संशय घेऊन मालकांनी तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे नव्याने गुन्हा दाखल झाला नाही, मात्र तिच्या गुन्हेगारी पद्धतीची पुष्टी झाली.

हरियाणा, हिमाचल प्रदेश, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव अशा विविध ठिकाणी तिने अशाच प्रकारे सोन्याची चोरी केल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत उघड झाले आहे. पोलिसांच्या मते तिच्या गुन्ह्यांचा व्याप आणखी मोठा असण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्हीच्या धाग्यावरून केलेल्या या कारवाईने शहरातील सुवर्णव्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांनी सतत नवी तांत्रिक सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम