
नायगाव धरणात बुडून अनोळखी पुरुषाचा मृत्यू
नायगाव धरणात बुडून अनोळखी पुरुषाचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारात असलेल्या नायगाव धरणात पाण्यात बुडून एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे दाखल असलेल्या एमएलसी क्रमांक 20605/2025 अन्वये अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना प्राप्त झाली. सदर व्यक्तीचा मृत्यू शिरसोली शिवारातील नायगाव धरणाच्या पाण्यात बुडाल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाले. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असून, मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. सदर व्यक्तीबाबत कोणताही पत्ता किंवा ओळखपत्र उपलब्ध नसल्याने पोलिसांकडून परिसरातील गावांमध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १९४ अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढे येऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम