नाशिक येथे अनुसुचित जातीतील महिला-पुरुषांसाठी ४५ दिवसीय फूड प्रोसेसिंग तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण

बातमी शेअर करा...

नाशिक येथे अनुसुचित जातीतील महिला-पुरुषांसाठी ४५ दिवसीय फूड प्रोसेसिंग तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण

        जळगाव दि. ११ – महाराष्ट्र शासन, उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जातीच्या उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजने’ अंतर्गत, तसेच महाराष्ट्र उद्योजक, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (मैत्री) मुंबई यांच्या सहकार्याने, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) नाशिक विभागामार्फत जिल्हा उद्योग केंद्रांच्या सहकार्याने फक्त अनुसुचित जाती (एससी) महिला-पुरुषांसाठी ४५ दिवसीय निवासी व निशुल्क फूड प्रोसेसिंग (बेकरी, मसाले, फळ-भाजीपाला प्रक्रिया) तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सदर प्रशिक्षणातून बेकरी उत्पादन, मसाले उत्पादन, फळ-भाजीपाला प्रक्रिया तसेच तेलघानी यांचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. याशिवाय उद्योजकता विकास, व्यक्तिमत्व विकास, मार्केट सर्व्हे, प्रकल्प अहवाल तयार करणे, डिजिटल मार्केटिंग, ई-टेंडरिंग, उद्योग नोंदणी, शासकीय कर्ज योजना, कारखाना भेटी आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे.

नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील निवासी, वय १८ ते ४५ वर्षे, किमान सातवी उत्तीर्ण, स्वतःचा उद्योग सुरू करण्याची तीव्र इच्छाशक्ती असलेले फक्त अनुसुचित जाती (एससी) महिला-पुरुष यासाठी पात्र आहेत. प्रशिक्षणार्थींची निवड मुलाखत पद्धतीने होणार असून, यापूर्वी या योजनेत प्रशिक्षण घेतलेल्यांना पुन्हा संधी मिळणार नाही.

इच्छुकांनी दि. १८ ऑगस्ट २०२५ पूर्वी व्हॉट्सअ‍ॅप क्र. ९१६८६६७१७२ वर प्रशिक्षणाचे नाव, पूर्ण नाव, पत्ता, शेवटचे शिक्षण, जात, जन्मतारीख व मोबाईल क्रमांक पाठवावा. अधिक माहितीसाठी श्री. दिनेश पाटील, प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जळगाव किंवा श्री. विवेक सैंदाणे, कार्यक्रम समन्वयक, एमसीईडी जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव (मो. क्र. ८२०८६६६४५८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम