निंभोरा: आत्महत्येच्या तपासात विहिरीत सापडला अज्ञात मानवी सांगाडा

खळबळजनक घटना; पोलिसांचा सखोल तपास सुरू

बातमी शेअर करा...

निंभोरा: आत्महत्येच्या तपासात विहिरीत सापडला अज्ञात मानवी सांगाडा

खळबळजनक घटना; पोलिसांचा सखोल तपास सुरू

निंभोरा, ता. रावेर,  निंभोरा गावाजवळील मोठा वाघोदा रोडलगतच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह काढताना पोलिसांना एक अज्ञात मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर निंभोरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सांगाड्याची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.

निंभोरा येथील देवेंद्र भागवत सोनवणे (वय २७) याने गावातील उज्वल नरेंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली होती. १४ एप्रिल रोजी या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, फौजदार अभय ढाकणे, पोहेकॉ अविनाश पाटील आणि किरण जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने देवेंद्र याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

मात्र, मृतदेह काढताना विहिरीच्या तळाशी अज्ञात व्यक्तीचा सांगाडा आढळून आला. हा सांगाडा कमरेपासून मांडीपर्यंतचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सांगाड्याच्या अवशेषांमुळे ही घटना अधिक रहस्यमय बनली आहे.

पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून सांगाड्याचे अवशेष डीएनए चाचणीसाठी पाठवले आहेत. सांगाड्याचा पंचनामा करून तो भातखेडा शिवारात अंत्यसंस्कारपूर्वक पुरण्यात आला. सांगाड्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.

 

या खळबळजनक घटनेचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अभय ढाकणे आणि त्यांच्या पथकाकडून सुरू आहे. सांगाडा कोणाचा आहे, तो विहिरीत कसा आला आणि त्यामागील कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास तीव्र केला आहे. डीएनए चाचणीच्या अहवालानंतर या प्रकरणात अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

आत्महत्येच्या तपासात अचानक सापडलेल्या सांगाड्यामुळे निंभोरा आणि परिसरात चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांच्या तपासातून या रहस्यमय सांगाड्याची ओळख आणि त्यामागील सत्य उघड होण्याची ग्रामस्थांना उत्सुकता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम