
निंभोरा पोलीसांची धडाकेबाज कारवाई : १२ लाखांचा माल हस्तगत
निंभोरा पोलीसांची धडाकेबाज कारवाई : १२ लाखांचा माल हस्तगत
शेतीसाहित्य, बॅटऱ्या, मोटारसायकली, नॅनो कारसह १० गुन्ह्यांचा पर्दाफाश; नऊ जण अटकेत, मुख्य आरोपी फरार
जळगाव प्रतिनिधी :
शेती उपयोगाचे साहित्य, तोलकाटा वरील बॅटरी-इन्व्हर्टर साहित्य तसेच मोटारसायकल आणि कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश निंभोरा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला असून याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र टोळीचा मुख्य सूत्रधार फरार झाला आहे. आरोपींकडून तब्बल १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून निंभोरा, सावदा, यावल, रावेर, मुक्ताईनगर परिसरात शेतकऱ्यांचे शेतीसाठी लागणारे साहित्य आणि वाहने चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर विशेष लक्ष ठेवून प्रभारी अधिकारी हरीदास बोचरे यांनी पथक तयार करून नाकाबंदी, रात्रगस्त आणि तांत्रिक तपास सुरू केला. ११ सप्टेंबर रोजी गुप्त माहितीवरून संशयित विलास उर्फ काल्या सुपडु वाघोदे (रा. वडगाव नदीकाठी) याचा शोध घेतला असता तो पोलिसांना चकवा देऊन पसार झाला. मात्र त्याच्या झोपडीतून एक महिला मिळाली. चौकशीत तिने वाघोदे व साथीदारांच्या चोरीची कबुली दिली.
या कबुलीनंतर स्वप्नील वासुदेव चौधरी (रा. निंभोरा बु.) यास अटक करून त्याच्या गोडावून आणि घरातून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल मिळून आला. यात एच.टी.पी. पंप मशिन ५, मोठ्या बॅटऱ्या ११, लहान बॅटऱ्या ३, इन्व्हर्टर मशिन ७, मोटारसायकली ४, पावर ट्रॉली लहान ट्रॅक्टर २, नॅनो कार १, सोलर प्लेट २, मटेरियल बॅग ११, ठिबक नळ्या ३ बंडल आणि इतर शेती व इलेक्ट्रिक साहित्य असा तब्बल १२ लाखांचा माल आहे.
या प्रकरणी मुख्य आरोपी विलास वाघोदे (फरार), एक महिला, गोपाळ भोलनकर, आकाश घोटकर, अर्जुन सोळंकी, जमील तडवी, स्वप्नील चौधरी, राकेश तडवी, ललित पाटील, राहुल ऊर्फ मयुर पाटील अशी दहा जणांची टोळी उघड झाली आहे. यांच्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनचे ५, यावलचे २, रावेरचे १, मुक्ताईनगरचे १ आणि सावदा पोलीस स्टेशनचा १ असा एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
या कारवाईत निंभोरा पोलीस स्टेशनचे हरीदास बोचरे, दिपाली पाटील, ममता तडवी, सुरेश अढायंगे, बिजु जावरे, रिजवान पिंजारी, अविनाश पाटील, किरण जाधव, रशिद तडवी, सर्फराज तडवी, रफिक पटेल, अमोल वाघ, प्रभाकर ढसाळ, प्रशांत चौधरी, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, भुषण सपकाळे, सुभाष शिंदे, योगेश चौधरी, राहुल केदारे यांच्यासह महिला पोलीस अंमलदारांचा समावेश होता. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सोपान गोरे, प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, बबन पाटील, प्रदिप चवरे, प्रदिप सपकाळे, मयुर निकम, सचिन घुगे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
निंभोरा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळून १० गुन्ह्यांचा पर्दाफाश केल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी या धडाकेबाज कारवाईचे कौतुक केले असून नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास आणि सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम