
निंभोरा पोलीस ठाण्याचा हवालदाराला २० हजारांची लाच घेतांना अटक
निंभोरा पोलीस ठाण्याचा हवालदाराला २० हजारांची लाच घेतांना अटक
रावेर तालुक्यात खळबळ
रावेर : निंभोरा पोलीस स्टेशनचे हवालदार सुरेश पवार हे २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले असून या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांनी शेतकऱ्याकडून एक लाख २७ हजार रुपये किमतीचा केळीचा माल खरेदी करून तो दिल्लीतील व्यापाऱ्यांना विकला होता; मात्र त्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना न दिल्याने संबंधितांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तक्रारदारांना निंभोरा पोलीस स्टेशनवर बोलावण्यात आले. यावेळी हवालदार सुरेश पवार यांनी तक्रार अर्जात नमूद रकमेच्या दहा टक्के प्रमाणे लाच मागितल्याची तक्रार त्यांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी एसीबीकडे केली होती.
तक्रारीनुसार एसीबीने त्याच दिवशी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यावेळी हवालदार पवार यांनी तक्रारदाराविरुद्ध गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि चौकशीत “योग्य ती मदत” करण्याच्या मोबदल्यात निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकार्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगत २०,००० रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोहेकॉ किशोर महाजन, मपोहेकॉ संगीता पवार, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी व पोकॉ भूषण पाटील यांनी संयुक्तपणे केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम