
निमखेडीत तरुणाची क्रूर हत्या
निमखेडीत तरुणाची क्रूर हत्या
डोक्यात धारदार शस्त्राचे वार; एक संशयित पोलिसांच्या ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) :
जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात रविवारी (दि. १४ डिसेंबर) रात्री घडलेल्या एका भीषण घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सागर साहेबराव सोनवणे (वय २७) या तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने गावात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे सव्वादहा वाजताच्या सुमारास सागर सोनवणे याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. डोक्यात वार केल्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत निमखेडी गावातील राममंदिर परिसरात टाकून आरोपी फरार झाले. काही वेळातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सागर ग्रामस्थांच्या निदर्शनास आला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
ग्रामस्थ व नातेवाईकांनी तातडीने सागरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मृत सागरच्या पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम