निवडणूक प्रचारातील ‘प्रलोभन’ वक्तव्यांवर निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी; २० नेते रडारवर

बातमी शेअर करा...

निवडणूक प्रचारातील ‘प्रलोभन’ वक्तव्यांवर निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी; २० नेते रडारवर

मुंबई │ राज्यात नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मतदान तर बुधवारी मतमोजणी होणार आहे. प्रचाराची मुदत संपण्यास काही तास शिल्लक असतानाच निवडणूक आयोगाने मोठी कारवाईसूचक हालचाल सुरू केली असून, अनेक नेत्यांच्या ‘प्रलोभन देणाऱ्या’ वक्तव्यांवर गंभीर दखल घेण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रचारादरम्यान मतदारांना आर्थिक लाभ, निधी, सवलती किंवा इतर प्रलोभने देण्याच्या आशयाची वक्तव्ये समोर आली आहेत. या सर्व प्रकरणांवर राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवला असून, आयोगाच्या धारेवर २० जणांच्या वक्तव्यांची नोंद झाली आहे.

यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शिरसाठ, मंत्री जयकुमार गोरे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांसह अनेक नेत्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

प्रचाराच्या धामधुमीत अनेक विधानांनी वाद निर्माण केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “तुमच्याकडे मत तर माझ्याकडे निधी” असा उल्लेख केल्याचे बोलले जाते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी “लक्ष्मी दर्शन” असा आशय व्यक्त केला होता; तर एकनाथ शिंदे यांनी “तिजोरीच्या चाव्या” संदर्भात वक्तव्य केले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी “खा कुणाचंही मटण, दाबा कमळाचं बटण” असा उल्लेख केल्याने खळबळ उडाली होती.

वरील सर्व वक्तव्यांची नोंद निवडणूक आयोगाने घेतली असून, संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. या अहवालांच्या आधारे पुढील कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

दरम्यान, भाजप कार्यकर्त्याच्या घरी छाप्याप्रकरणी निलेश राणे यांचीही अडचण वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम