नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या तरुणाला मानसोपचारातून नवजीवन

बातमी शेअर करा...

नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या तरुणाला मानसोपचारातून नवजीवन
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञांचा यशस्वी उपचार; मानसिक आरोग्याबाबत जागृतीचा संदेश
भुसावळ : जीवनातील दुःखद घटना, सततचा मानसिक तणाव आणि व्यसनाधीनतेमुळे नैराश्यात अडकलेल्या एका ३३ वर्षीय तरुणाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी यशस्वी उपचारांच्या माध्यमातून नवजीवन दिले आहे. ही घटना केवळ वैद्यकीय यशापुरती मर्यादित न राहता समाजात मानसिक आरोग्याबाबत सकारात्मक जागृती निर्माण करणारी ठरली आहे.
सुमारे दहा महिन्यांपूर्वी रुग्णाच्या वडिलांचे अचानक निधन झाले. या घटनेचा त्याच्या मनावर खोल आघात झाला आणि त्यातूनच हळूहळू नैराश्याची लक्षणे वाढू लागली. या मानसिक अस्थैर्याच्या काळात मद्यपानाची सवय लागून ती व्यसनात परिवर्तित झाली. वाढत्या तणावाखाली रुग्णाने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच मिळालेल्या मदतीमुळे त्याचे प्राण वाचले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी विलंब न करता रुग्णाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागात दाखल केले. येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. ऋचिता आटे आणि डॉ. देवांश गणात्रा यांनी रुग्णाचे सखोल मानसिक व शारीरिक मूल्यांकन केले. त्यानंतर ईसीटी, औषधोपचार, वैयक्तिक समुपदेशन आणि व्यसनमुक्ती उपचारांचा समन्वय साधत सविस्तर उपचार योजना राबविण्यात आली.
उपचार प्रक्रियेत वैयक्तिक समुपदेशनासोबत कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग, गटचर्चा, योग व ध्यानधारणा यांचा प्रभावी वापर करण्यात आला. सातत्यपूर्ण उपचार, सकारात्मक मानसिक आधार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे काही आठवड्यांतच रुग्णाच्या मानसिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. सध्या हा तरुण पूर्णपणे व्यसनमुक्त असून तो पुन्हा आपल्या दैनंदिन कामकाजात सक्रियपणे सहभागी झाला आहे.
मानसोपचार विभागातील तज्ज्ञांनी सांगितले की, नैराश्य किंवा मानसिक आजार लपवून ठेवण्याऐवजी वेळीच ओळखून योग्य उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. आधुनिक उपचारपद्धती, प्रशिक्षित तज्ज्ञ आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळे मानसिक आजारातून बाहेर पडणे शक्य असून अशा अनेक रुग्णांना नवजीवन मिळत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम