
नोकरीच्या तणावातून उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या
जळगाव: रोजगाराच्या शोधात असलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना जुने जळगावातील रामपेठ परिसरात घडली आहे. जयेश मुरलीधर खडके (वय २७) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जयेश खडके हा एमसीए (MCA) पर्यंत शिकलेला होता आणि गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. नोकरी मिळत नसल्यामुळे तो मानसिक तणावात असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.
मंगळवारी रात्री अकरा वाजता जयेश त्याच्या खोलीत होता, तर त्याचे कुटुंबीय खालच्या खोलीत होते. जयेशने जेवण न केल्यामुळे त्याची आई त्याला जेवण्यासाठी बोलावण्यासाठी वडिलांना वर पाठवले. वडील मुरलीधर खडके वरच्या खोलीत गेले असता, त्यांना जयेशने गळफास घेतल्याचे आढळले. ही हृदयद्रावक घटना पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
जयेशच्या वडिलांनी तात्काळ शेजारी राहणाऱ्या माजी नगरसेवक सुनील खडके यांना फोन केला. त्यानंतर जयेशला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
या घटनेने खडके कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. जयेशच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम