न्याय सेवेचा महायज्ञ’; सहा वर्षांत तब्बल बाराशे शिबिरे; बोदवड वकील संघाचे राज्यभर कौतुक

बातमी शेअर करा...

न्याय सेवेचा महायज्ञ’; सहा वर्षांत तब्बल बाराशे शिबिरे; बोदवड वकील संघाचे राज्यभर कौतुक

ॲड. उज्वल निकम यांचा गौरव : “पीडित, महिला, शेतकरी, वंचितांना न्याय देणारे महाराष्ट्राचे रोल मॉडेल”

बोदवड – सर्वोच्च न्यायालयाच्या ‘जस्टीस ॲट डोअर’ – न्याय आपल्या दारी या तत्त्वाला वास्तविक रूप देत बोदवड तालुका वकील संघाने गेल्या सहा वर्षांत घेतलेल्या तब्बल बाराशेहून अधिक कायदेशीर सहाय्यता शिबिरांच्या कार्याचा राज्यभरातून गौरव होत आहे. १६ जून २०१९ रोजी न्यायालय स्थापन झाल्यापासून अवघ्या कार्यकाळात एवढे मोठे काम उभे करणारा बोदवड वकील संघ महाराष्ट्रासाठी ‘रोल मॉडेल’ ठरत असल्याचे मत ख्यातनाम विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी व्यक्त केले.

वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्या सहकाऱ्यांनी समाजातील पीडित, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, कामगार, आदिवासी आणि वंचित घटकांना न्याय हक्कांबाबत जागरूक करत “न्याय सेवेचा महायज्ञ” उभारल्याचे जिल्हा न्यायाधीशांनीही कौतुक केले.

लोकअदालतींपासून ई-फायल, महाविद्यालयीन कार्यशाळांपर्यंत प्रभावी कामगिरी

बोदवड वकील संघाचे काम केवळ कायदेविषयक शिबिरांपुरते न राहता विविध सामाजिक, शैक्षणिक आणि न्यायविषयक अभियानांपर्यंत विस्तारले—
• लोक अदालतीत उल्लेखनीय निपटारा : बँकिंग, ग्रामपंचायत, महसूल, वीज महामंडळ यांसह लाखो रुपयांच्या वसुली, तडजोडीची प्रकरणे सोडवून नागरिकांना दिलासा.
• कायदेविषयक कार्यशाळा : मानवाधिकार, संविधान दिन, विधी सेवा दिवस, जागतिक न्याय दिवस, आदिवासी गौरव दिन, बालिका दिन आदी सामाजिक उपक्रमांतून व्यापक जागरूकता.
• महाविद्यालये व शाळा : युवा दिन, व्यसनाधीनता जनजागृती, एनडीपीएस कायदा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
• पोलिस ठाणे व सार्वजनिक स्थळे : वाहतूक नियम, अपघात विमा हक्क, आदिवासी वस्त्यांवरील विशेष सत्रे, मंदिर परिसर, तहसील कार्यालय, रेल्वे स्टेशनवरील जनजागृती.

विविधांगी लीगल एड शिबिरांतून हक्कांची जाणीव

पीडित महिला व बालके : पीडितांचे न्यायहक्क, महिला कायदे, ‘बेटी बचाव-बेटी पढाव’, पोस्को मार्गदर्शन.
शेतकरी व नागरिक : महसूल अधिनियम, मामलेदार कोर्ट ॲक्ट, पोलीस पाटील कायदे, मतदार जनजागृती.
वंचित व दुर्बळ गट : कामगारांचे हक्क, ज्येष्ठ नागरिक न्याय संरक्षण, आदिवासी हक्क, विधी सेवा अभियान.

ॲड. निकम यांचा गौरवपूर्ण संदेश

“बाराशेहून अधिक शिबिरे घेणे ही केवळ सामाजिक बांधिलकी नव्हे, तर न्याय सेवेची खरी साधना आहे. ‘जस्टीस ॲट डोअर’चे जे कार्य बोदवड वकील संघाने उभे केले, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनुकरणीय आहे,” असे ॲड. उज्वल निकम म्हणाले.
ते पुढे म्हणाले— “मी बोदवडला येऊन संघाचा नागरी सत्कार स्वीकारेन आणि नवोदित वकिलांना मार्गदर्शनही करीन.”

जळगाव येथील कार्यक्रमास ॲड. अर्जुन पाटील, ॲड. धनराज प्रजापती, ॲड. किशोर महाजन, ॲड. मोहिनी नायसे यांच्यासह तालुक्यातील वकील उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम