
पंकज बालसंस्कार केंद्रात पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न
पंकज बालसंस्कार केंद्रात पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी – पंकज बालसंस्कार केंद्र, चोपडा येथे पालक-शिक्षक सभेचे औचित्यपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग किती महत्त्वाचा आहे यावर भर देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सभेचा मुख्य उद्देश कृतीयुक्त शिक्षण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण ज्ञान, चारित्र्य व कौशल्यांचा विकास घडविणे हा होता. शालेय स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत पालकांना माहिती मिळावी तसेच त्यांच्या सूचना शैक्षणिक प्रगतीसाठी उपयोगी पडाव्यात, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
अध्यक्षस्थानावर डॉ. राहुल पाटील होते. त्यांनी आपल्या भाषणात शाळेतील शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी विज्ञान, क्रीडा व कलाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी विद्यालयाने केलेल्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. विभाग प्रमुख सौ. मीना माळी यांनी कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पालकांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन केले. सौ. भावना दीक्षित यांनी अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, नृत्य, संगीत, चित्रकला व क्रीडा संधींची माहिती दिली.
मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी पालकांशी मुक्त संवाद साधत विद्यार्थ्यांनी पुस्तकापुरते मर्यादित न राहता कला, शारीरिक शिक्षण, नाटक व सर्जनशील लेखन यांसारखी कौशल्ये आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. शाळेत उपलब्ध असलेल्या आधुनिक शैक्षणिक साधनसामग्रीची माहितीही त्यांनी पालकांना दिली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी श्लोक, प्रार्थना, गाणी, गोष्टी तसेच विविध प्रात्यक्षिके सादर करून पालकांची वाहवा मिळवली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता व सादरीकरण कौशल्याचा उत्तम प्रत्यय उपस्थितांना आला.
सभेला एकूण २८० पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. पालक प्रतिनिधी रोहन जोशी, रणछोड पाटील व विजयानंद शिंदे यांनी शाळेच्या शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम व सुविधांविषयी समाधान व्यक्त करून शाळेच्या उपक्रमांना भविष्यात सक्रीय पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. योगिता कोळी यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती छाया बारी यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम