पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात ४६ विद्यार्थ्यांची निवड

मेळाव्यासाठी ९०० तरूणांनी नोंदणी केली

बातमी शेअर करा...

पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात ४६ विद्यार्थ्यांची निवड
मेळाव्यासाठी ९०० तरूणांनी नोंदणी केली
जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष आणि जळगाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ जानेवारी २०२५ रोजी विद्यापीठात झालेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात ४६ विद्यार्थ्यांची अंतिम तर ३९५ विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली.

विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या रोजगार मेळाव्यात ३६ कंपन्या सहभागी झालया होत्या त्यामध्ये जळगाव, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी येथील कंपन्यांचा समावेश होता. या मेळाव्यासाठी ९०० तरूणांनी नोंदणी केली होती. काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार एकापेक्षा अधिक पदासाठी मुलाखतीची संधी असल्यामुळे एकूण १२७४ विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्यात. या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या रोजगार मेळाव्यातून ४६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली. ३९५ विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड झाली आहे.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन खा. स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले . अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, सहायक संचालक व सहायक केंद्रीय ॲप्रेंटिशिप सल्लागार श्री. एन.सी. गांगडे, व्य.प. सदस्य ॲङ अमोल पाटील, डॉ. पवित्रा पाटील, सिनेट सदस्य प्रा. विशाल पराते, नितीन ठाकूर, स्वप्नाली काळे, अमोल मराठे तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संदीप गायकवाड, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, कौशल्य अधिकारी वृषाली भडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या की, तरूणांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेत आहे. या प्रयत्नात विद्यापीठ सहभागी झाल्यामुळे आनंद झाला. जिद्द, मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली तर नोकरी अथवा व्यवसायात यश मिळते. शरीराला आणि मनाला कष्ट आणि मेहनतीची सवय लावून घेण्याचे आवाहन खा. वाघ यांनी केले. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी समजासाठी जबाबदार नागरीक, देशासाठी संवेदनशील नागरीक आणि रोजगारक्षम विद्यार्थी तयार करण्याची जबाबदारी विद्यापीठावर आहे. या भागातील विद्यार्थी प्रामाणिक आण‍ि परीश्रम करणारे आहेत मात्र संवाद कौशल्यात तो कमी पडतो. त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेवून प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले असल्याचे प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले.

निखील गांगडे यांनी या मेळाव्यातून नोकरी प्राप्त झाली नाही तरी निराश न होता एनएटीएस च्या पेार्टलवर नोंदणी करावी. शासनाकडून विविध योजना राबबिल्या जात आहेत अशी माहिती दिली. प्रास्ताविकात संदीप गायकवाड यांनी कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राकडून सुरु असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. एका छताखाली कंपन्या आणि विद्यार्थी यांना आणण्याचे काम या मेळाव्यातून साध्य झाल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. विजय घोरपडे यांनी केले तर केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक डॉ. रमेश सरदार यांनी आभार मानले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा. रमेश सरदार, डॉ. उज्ज्वल पाटील, सोनाली दायमा यांच्यासह विविध प्रशाळांमधील समन्वयक आदींनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम