
पंढरपूर वारीत गिरीश महाजन यांची १७ तासांची अविरत सेवा
पंढरपूर वारीत गिरीश महाजन यांची १७ तासांची अविरत सेवा
गर्दी व्यवस्थापनात उभारला नवा सेवाव्रती आदर्श
पंढरपूर | प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत विशेष स्थान असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांनी पंढरपूरात दर्शनासाठी गर्दी केली असताना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः मैदानात उतरून १७ तास अविरत सेवा देत एक आगळा-वेगळा आदर्श घालून दिला.
५ जुलैच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेली ही सेवा ६ जुलैच्या सायंकाळपर्यंत अखंड सुरू होती. कोणतीही विश्रांती न घेता, ऊन्हा-पावसाची पर्वा न करता महाजन यांनी महाद्वार परिसरातील नियंत्रण टॉवरवरून थेट परिस्थितीवर नजर ठेवली. सकाळी साडेपाच वाजता त्यांनी टॉवरवर चढून क्राउड मॅनेजमेंटची सूत्रे स्वतः हाती घेतली आणि सायंकाळपर्यंत तेथेच कार्यरत राहिले.
या काळात त्यांनी वॉकी-टॉकीच्या माध्यमातून पोलीस, आपत्कालीन यंत्रणा व स्वयंसेवकांशी सातत्याने समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. गरज भासल्यास स्वतः मैदानात जाऊन वारकऱ्यांना मार्गदर्शन केले, वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये याची विशेष दक्षता घेतली.
महाजन यांच्या या सेवाभावी कामगिरीस वारकरी, पोलीस कर्मचारी, स्वयंसेवक व प्रशासन यांच्याकडून मोठी दाद मिळाली. अनेक भाविकांनी टॉवरकडे पाहून हात जोडले, तर काहींनी “सेवक असा असावा” अशी प्रतिक्रिया दिली.
फक्त मंत्री म्हणून नव्हे, तर एक खरा सेवक म्हणून गिरीश महाजन यांनी आपली भूमिका बजावली असून त्यांच्या या कार्यातून भावी पिढीसाठी सार्वजनिक सेवेचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम