
पत्नीकडून पतीची कुऱ्हाडीने हत्या; माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेला अटक
पत्नीकडून पतीची कुऱ्हाडीने हत्या; माजी ग्रामपंचायत सदस्य महिलेला अटक
रावेर: तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे एका महिलेने कौटुंबिक वादातून आपल्या पतीचा कुऱ्हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी महिलेला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
मृत व्यक्तीचे नाव हुसेन रसूल तडवी (वय ६५) असून, ते न्यू इंग्लिश स्कूल निंभोरा येथे सेवानिवृत्त शिपाई होते. त्यांची पत्नी आणि या प्रकरणातील आरोपी हाजराबाई हुसेन तडवी या माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन तडवी हे सतत पत्नी हाजराबाई यांना मारहाण करून त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून हाजराबाई यांनी रागाच्या भरात ३० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता गणेश कॉलनीतील आपल्या राहत्या घरात कुऱ्हाडीने पतीच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अविनाश पाटील यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, दीपाली पाटील यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी हाजराबाई तडवी यांना अटक केली असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत हुसेन तडवी यांचे शवविच्छेदन रावेर येथील रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर मूळगावी कुंभारखेडा (ता. रावेर) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम