
पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या
धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे संतापजनक घटना
पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या
धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे संतापजनक घटना
धरणगाव (प्रतिनिधी): चारित्र्यावर संशय घेत पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना २६ मार्चच्या मध्यरात्री धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथे घडली. या हल्ल्यात त्यांचा १० वर्षीय मुलगा जखमी झाला असून तो थोडक्यात बचावला आहे.
मयत महिलेचे नाव शीतल उर्फ आरती सोमनाथ सोनवणे (वय ३२) असून आरोपी पतीचे नाव सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे आहे. या दाम्पत्याला एक १० वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांची मुलगी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ सोनवणे याला नेहमीप्रमाणे पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत असे. २६ मार्चच्या मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर सोमनाथ याने कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केले. या वेळी मुलगा सिंधू सोनवणे याला देखील बचावाच्या प्रयत्नात हातावर गंभीर इजा झाली.
दोघांनाही त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान २७ मार्च रोजी मध्यरात्री शीतल सोनवणे यांचा मृत्यू झाला. जखमी मुलावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणी शीतल सोनवणे यांचे भाऊ भाऊसाहेब पवार यांच्या फिर्यादीवरून २८ मार्च रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले, स.पो.नि. नीलेश वाघ आणि पो.उ.नि. संतोष पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पुरावे गोळा केले.
या प्रकरणी आरोपी सोमनाथ सोनवणे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ. राजू पाटील करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम