
पदविकाधारक पशुवैद्यकांच्या न्याय मागण्यांसाठी पाठपुरावा करणार – आ. मंगेश चव्हाण
पदविकाधारक पशुवैद्यकांच्या न्याय मागण्यांसाठी पाठपुरावा करणार – आ. मंगेश चव्हाण
चाळीसगाव | प्रतिनिधी –
पदविकाधारक पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले.
या मागण्यांसंदर्भात चाळीसगाव येथे पशु चिकित्सा व्यवसायी संघटना आणि पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचे संयुक्त शिष्टमंडळ आमदार चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी डॉ. संजय पाटील, डॉ. भगवान पाटील, डॉ. ज्ञानदेव दातीर, डॉ. संदीप पाटील, डॉ. राकेश साळुंखे, डॉ. अनिल पाटील, डॉ. दीपक लोखंडे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. दीपक शेवाळे, डॉ. राकेश पाटील आदी उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांपूर्वी इयत्ता १२ वी विज्ञाननंतर तीन वर्षांचा पशु चिकित्सा शास्त्र पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय झाला होता; मात्र तो आजतागायत सुरू झालेला नाही. तसेच दुग्धोत्पादन पदविका धारकांसाठी ३/६ महिन्यांचा पूरक अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव १५ वर्षांपूर्वी दिला असतानाही त्यावर कार्यवाही झालेली नाही, अशी खंत शिष्टमंडळाने व्यक्त केली.
पॅरामेडिकल सायन्समध्ये १३४ प्रकारच्या शैक्षणिक संधी उपलब्ध असताना पशुवैद्यकीय क्षेत्रात सक्षम पदविका अभ्यासक्रम उपलब्ध नसणे ही पशुसंवर्धन विभागासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. राज्यात १.९ लाख पदविकाधारक पशुवैद्यक असताना, केवळ १० वी नंतर तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अशा प्रकारच्या चुकीच्या हाताळणीमुळे लाखो जनावरे भाकड होण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आणत, या प्रकरणी उच्चस्तरीय बैठक घेऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.
या वेळी डॉ. हेमंत कुमावत, डॉ. राहुल साळुंखे, डॉ. दत्ता जाधव, डॉ. रवि कोळी, डॉ. सुकलाल कोळी, डॉ. पंकज सैदाने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम