
पद्मश्री चैत्राम पवार यांचा नूतन मराठा महाविद्यालयातर्फे सत्कार
महाविद्यालयात वृक्षारोपणाचा उपक्रम
नूतन मराठा महाविद्यालयातर्फे यांचा सत्कार
महाविद्यालयात वृक्षारोपणाचा उपक्रम
जळगाव प्रतिनिधी ;- धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या छोट्याशा गावात ‘जल, जंगल, जमीन, जन, जनावर’ या पंचसूत्रीच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे अनोखे प्रयोग राबवून गावाला सर्वांगीण प्रगतीच्या शिखरावर नेणारे पद्मश्री चैत्राम पवार यांचा भव्य सत्कार सोहळा जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित, जळगाव संचलित नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात डॉ. रणजीत चव्हाण उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. देशमुख होते. त्यांच्या हस्ते पद्मश्री चैत्राम पवार यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
डॉ. रणजीत चव्हाण यांनी “चैत्राम पवार हे चालते-बोलते विद्यापीठ आहेत,” अशा प्रभावी शब्दांत त्यांचा गौरव केला. स्वतःच्या अनुभवांचे प्रेरणादायी कथन करत त्यांनी उपस्थितांमध्ये चैत्राम पवार यांच्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बारीपाडा गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या चैत्राम पवार यांच्या कार्याचा माहितीपट दाखवण्यात आला, ज्याने उपस्थितांना थक्क केले.
सत्काराला प्रतिसाद देताना पद्मश्री चैत्राम पवार यांनी आपला प्रेरणादायी प्रवास उलगडला. ते म्हणाले, “उच्च शिक्षण घेऊनही मी नोकरी न स्वीकारता, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता गावाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले. गावकऱ्यांची मने जिंकून त्यांना या कार्यात सहभागी करून घेतले. अनेक अडथळ्यांना तोंड देत ‘जल, जंगल, जमीन, जन, जनावर’ या पंचसूत्रीवर काम करून बारीपाडा हे आदिवासी गाव जगाच्या नकाशावर दुसऱ्या क्रमांकाचे आदर्श गाव बनवले.” त्यांनी सांगितले की, या प्रवासात त्यांना अनेकांची साथ मिळाली, तर काही विरोधकही निर्माण झाले; पण त्यांनी आपले ध्येय कधीही सोडले नाही. नूतन मराठा महाविद्यालयाने त्यांच्या या अतुलनीय कार्याला सत्काराद्वारे प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर प्रा. तेजल पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, उपप्राचार्या एम. एस. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, प्रा. इंदिरा पाटील, प्रा. ललिता हिंगोणेकर, प्रा. डी. आर. चव्हाण, प्रा. एन. जे. पाटील, प्रा. राकेश गोरसे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. डॉ. मंगला तायडे, प्रा. वंदना पाटील, प्रा. सुनील गरुड यांच्यासह प्रा. आर. बी. देशमुख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते.
नूतन मराठा महाविद्यालयात वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम
नूतन मराठा महाविद्यालयात धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते तसेच जळगावचे प्रसिद्ध डॉ. रणजीत चव्हाण आणि प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या उपस्थितीत विविध उपयुक्त वृक्षांचे रोपण करण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमात बाळासाहेब नाईक, अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील आणि प्रा. शिवराज पाटील यांनी सहभाग घेतला

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम