पाचोरा तहसिल कार्यालयात १.२ कोटींचा अनुदान घोटाळा उघड; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

बातमी शेअर करा...

पाचोरा तहसिल कार्यालयात १.२ कोटींचा अनुदान घोटाळा उघड; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

पाचोरा: पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या नैसर्गिक आपत्तीमधील अनुदान परस्पर दुसऱ्यांच्या खात्यात वळवून तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घोटाळ्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या गैरव्यवहाराची फिर्याद तहसीलदार विजय शिवाजी बनसोडे यांनी दिली आहे. यानुसार, सन २०२२ ते २०२४ या काळात तत्कालीन महसूल सहाय्यक अमोल सुरेश भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण यांनी संगनमत करून हा घोटाळा केला. त्यांनी शेतीचा अनुभव नसलेल्या ३४७ व्यक्तींच्या नावाने बनावट याद्या तयार करून त्यांच्या खात्यात शासनाचे अनुदान जमा केले. त्यानंतर, संबंधित खातेदारांशी संपर्क साधून ही रक्कम काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात बनावट दस्तऐवज तयार करणे, अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करणे आणि तहसीलदारांच्या लॉगिन आयडीचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही अधिकारी, कर्मचारी आणि ई-सेवा केंद्र चालकांचाही सहभाग असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम