
पाचोरा नगरपालिका निवडणूक २०२५ : शिवसेना (शिंदे) गटाचा दणदणीत विजय; सुनिता पाटील नगराध्यक्षपदी
पाचोरा नगरपालिका निवडणूक २०२५ : शिवसेना (शिंदे) गटाचा दणदणीत विजय; सुनिता पाटील नगराध्यक्षपदी
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित करत नगराध्यक्षपदासह एकूण २८ पैकी २२ जागा पटकावल्या. भाजपाला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले, तर उबाठा व काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.
नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेना (शिंदे) गटाच्या सुनिता किशोर पाटील यांनी भाजपाच्या सुचेता दिलीप वाघ यांचा ११,३४८ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. सुनिता पाटील यांना २५,८६५ मते (२५,८११ + ५४ पोस्टल) मिळाली, तर सुचेता वाघ यांना १४,५१७ मते (१४,५१० + ७ पोस्टल).
आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी प्रभाग ९ मधून सर्वाधिक २,४८३ मतांसह विजय मिळवला (फरक १,५३४). तर माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र भूषण वाघ यांचा प्रभाग १ मधून ८७३ मतांनी पराभव झाला. मात्र, दिलीप वाघ यांचे पुतणे सुरज संजय वाघ यांनी प्रभाग १० मधून अवघ्या १९ मतांनी विजय मिळवला.
शिवसेना (शिंदे) गटाचे विजयी नगरसेवक : २२ जागा (प्रमुख : मनिषा बाविस्कर, किशोर बारवकर, संजय गोहील, वैशाली चौधरी, सतीष चेडे, रफिक बागवान, रशिदाबी शेख, खनसा बागवान, संजय चौधरी, रहेमान तडवी, प्रांजल सावंत, वर्षा व प्रवीण ब्राह्मणे, मिनाक्षी एरंडे, गणेश पाटील, सुमित व दीपाली पाटील, जयश्री पाटील, प्रियंका व संदिप पाटील, प्रदिप वाघ, सुरेखा पाटील)
भाजपाचे विजयी नगरसेवक : कविता विनोद पाटील, सुरज संजय वाघ, अमरीन देशमुख, राहुल गायकवाड (पुरस्कृत), कविता उमेश हटकर, गोपालदास वासवानी.
निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. आमदार किशोर पाटील यांनी “जनतेने विकासाला मतदान दिले” असे म्हणत शहराला दररोज पाणी पुरवठ्याचे आश्वासन पूर्ण करणार असल्याचे सांगितले. भाजपाचे अमोल शिंदे यांनी पराभव मान्य करत “चुका सुधारून पुन्हा जोमाने काम करू” अशी प्रतिक्रिया दिली.
या विजयामुळे पाचोरा शहराच्या विकासाला नवीन गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम