पाचोरा नगर परिषदेची थकीत कर वसुलीसाठी कारवाई

६ गाळे सील, ५९ नळ जोडण्या खंडित

बातमी शेअर करा...

पाचोरा नगर परिषदेची थकीत कर वसुलीसाठी कारवाई

६ गाळे सील, ५९ नळ जोडण्या खंडित

पाचोरा पाचोरा नगर परिषदेने शहरातील थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत २६ मार्च रोजी शहरातील ६ गाळे सील करण्यात आले, तर आतापर्यंत ५९ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांवर कारवाईसाठी नगर परिषदेने ६ विशेष पथके स्थापन केली असून, ही मोहीम पुढील काळातही तीव्र स्वरूपात सुरू राहणार आहे.

नगर परिषदेच्या पथकांनी २६ मार्च रोजी भडगाव रोडवरील पेट्रोल पंपासमोरील ४ गाळे आणि जळगाव रोडवरील कृष्णापुरी परिसरातील २ गाळे अशा एकूण ६ गाळ्यांवर सील ठोकले. याशिवाय, थकीत पाणीपट्टीमुळे ५९ नळ जोडण्याही खंडित करण्यात आल्या आहेत. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक डी. एस. मराठे आणि वसुली पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांवर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये चांगलीच धास्ती पसरली आहे, तर नियमित कर भरणाऱ्या नागरिकांनी नगर परिषदेच्या या पावलांचे स्वागत केले आहे. कारवाईनंतर अनेक थकबाकीदारांनी नगर परिषदेकडे धाव घेऊन थकीत कर भरण्यास सुरुवात केली आहे. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले की, थकीत करांवर शासनाच्या नियमानुसार दरमहा २ टक्के दंड आकारला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी तातडीने थकबाकी भरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

नगर परिषदेने स्पष्ट केले आहे की, थकबाकी वसुलीसाठी ही मोहीम दररोज सुरू राहणार आहे. थकबाकी न भरणाऱ्यांवर मालमत्ता सील करणे आणि नळ जोडण्या खंडित करणे यासारख्या कठोर कारवाया केल्या जातील. “नागरिकांनी वेळीच कर भरणे हाच पर्याय निवडावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी बजावले आहे. या कारवाईमुळे शहरातील कर वसुलीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम