
पाचोरा-भडगावमध्ये अतिवृष्टी ; ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ ३ पट मदत द्यावी
पाचोरा-भडगावमध्ये अतिवृष्टी ; ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ ३ पट मदत द्यावी
आमदार किशोर पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
पाचोरा/भडगाव | प्रतिनिधी
पाचोरा व भडगाव तालुक्यात १६ व २२-२३ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः पुरती वाताहत केली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे नष्ट झाला असून, जमिनी, सिंचन सुविधा, जनावरे, शेती यंत्रसामग्री, घर-संसार आणि वाहतुकीच्या सुविधा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, या दोन्ही तालुक्यांना ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून, एनडीआरएफच्या निकषानुसार तात्काळ तीन पट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार किशोर अप्टिल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
शेतात पाणीच पाणी, पीक सडून गेले
पाचोरा आणि भडगाव तालुक्यांतील अनेक शेतांमध्ये आजही पाण्याचा निचरा झालेला नाही. शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने उभे पीक सडले असून, काही भागांत शेतकऱ्यांना पिकात प्रवेश करणेही अशक्य झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पंचनाम्यानुसार, दोन्ही तालुक्यांतील पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याची नोंद आहे.
अतिवृष्टीचा सरकारी पर्जन्यमान अहवाल
१६ सप्टेंबर २०२५: ११४.८ मिमी
२२ सप्टेंबर २०२५: १४७.८ मिमी
२३ सप्टेंबर २०२५: १३९.३ मिमी
सरासरीच्या तुलनेत एकूण पर्जन्यमान: १८९%
या आकडेवारीवरून, सरासरी पर्जन्यापेक्षा दोनपटीने जास्त पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे. ही नोंद अधिकृत शासकीय पर्जन्यमापक केंद्रांमार्फत करण्यात आलेली आहे.
केवळ शेतीच नव्हे तर संपूर्ण जीवन उद्ध्वस्त
अतिवृष्टीमुळे शेतजमिनी वाहून गेल्या आहेत, विहिरींना धोका निर्माण झाला आहे, ठिबक सिंचन यंत्रणा, फळबागा, पाईपलाईन इत्यादी पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. शेतीपूरक जनावरे जसे की बैल, गाय, म्हैस, बकऱ्या, कोंबड्या यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अनेकांच्या घरांतील साहित्य, संसार वाहून गेला आहे. शहरी भागातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ते, पूल, बंधारे वाहून गेले आहेत. काही भागांत मळणी यंत्रे आणि शेती अवजारेही नष्ट झाली आहेत.
पूर्वीचा शासन निर्णय लागू करावा
लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार, ११ सप्टेंबर २०१९ रोजी पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसाठी लागू केलेल्या निर्णयानुसारच, पाचोरा व भडगाव तालुक्यांनाही तात्काळ तीनपट आर्थिक मदत मिळावी. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आमदार किशोर पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
अनेक संकटांनंतरही भरपाई मिळालेली नाही
गेल्या दोन वर्षांपासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यांमध्ये नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र त्याबाबतची सरकारकडून अद्याप भरपाई मिळालेली नाही, ही बाबही निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम