
पाचोरा व भडगाव नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचाच विजय – आ. किशोर पाटील
पाचोरा व भडगाव नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचाच विजय – आ. किशोर पाटील
पाचोरा प्रतिनिधी २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या पाचोरा व भडगाव नगरपालिकेच्या झालेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आ. किशोर पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे २६ उमेदवार यांची ३ डिसेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालयात बैठक घेऊन त्या त्या प्रभागातील माहिती जाणुन घेतली असता पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार १५ हजारांच्या मताधिक्याने व २६ नगरसेवक, भडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व २४ नगरसेवक यासह पाचोरा नगरपालिकेच्या २० डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ – अ व १२ – ब मधील २ उमेदवार असे २८ उमेदवार निवडून येवुन एक ऐतिहासिक असा विजय होत असल्याचे चित्र असल्याची माहिती आ. किशोर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, प्रविण ब्राम्हणे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. किशोर पाटील म्हणाले की, २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असुन राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी ही २१ डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहिर केले आहे. दरम्यान नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले असुन मतमोजणीस १८ दिवसांची वेळ असतांना या कालावधीत ईव्हीएम मशिन मध्ये छेडछाड होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र माझा निवडणूक आयोगावर पुर्ण विश्वास आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ईव्हीएम मशिन ठेवलेल्या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ज्या उमेदवारांना शंका उपस्थित होत असेल त्यांनी त्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक ठेवता येतील. त्याअनुषंगाने माझ्या उमेदवारांच्या आग्रहास्तव पाचोरा व भडगाव येथे ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन आवारात सुरक्षा रक्षक ठेवणार आहे. यासोबतच मी राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिन ठेवलेल्या आवारात उमेदवारांतर्फे सी. सी. टी. व्ही. लावण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करणार असल्याचे देखील आ. किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम