पाचोऱ्यात वीज कंपनीचा सहायक अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

बातमी शेअर करा...

पाचोऱ्यात वीज कंपनीचा सहायक अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

 

 

रिलीज ऑर्डर काढण्यासाठी २९ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

 

जळगाव: जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही थांबायला तयार नाहीत. अशातच, पाचोरा येथील वीज कंपनीच्या सहायक अभियंत्याला २९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही कारवाई आज (१२ ऑगस्ट) दुपारी करण्यात आली असून, यामुळे लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

नेमके काय घडले?

या प्रकरणातील तक्रारदार हे सोलर फिटिंगचा व्यवसाय करतात. त्यांनी तीन प्रकरणांची ‘रिलीज ऑर्डर’ काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. आरोपी मनोज मोरे याने प्रत्येक प्रकरणासाठी ३,००० रुपये, अशा एकूण ९,००० रुपयांची मागणी केली. यासोबतच, त्याने यापूर्वी दिलेल्या २८ प्रकरणांसाठी ‘वन टाइम पेमेंट’ म्हणून ७०,००० रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ३०,००० रुपये तक्रारदाराने यापूर्वीच दिले होते. उर्वरित ४०,००० पैकी २०,००० आणि चालू तीन प्रकरणांसाठी ९,००० रुपये, अशी एकूण २९,००० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

सहायक अभियंता मनोज मोरे याने आपल्या कार्यालयातच ही लाच स्वीकारली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा यशस्वी सापळा रचला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम