
पाचोऱ्यात १८ अवैध तलवारींसह तरुणाला अटक
पाचोऱ्यात १८ अवैध तलवारींसह तरुणाला अटक
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात अवैध शस्त्रविक्रीचा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. माहिजी नाका परिसरात १८ अवैध तलवारींसह एका इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले असून, जप्त शस्त्रांची किंमत तब्बल ५४ हजार रुपये आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना १८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यात सोहेल शेख तय्युब शेख (वय २४, रा. स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी विक्रीसाठी लपवून ठेवलेल्या १८ तलवारी हस्तगत केल्या. आरोपीने याआधीही काही शस्त्रांची विक्री केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४६०/२०२५ नोंदवून भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) सौ. कविता नेरकर व उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, पोकॉ संदीप राजपूत, जितेंद्र पाटील व हरीष परदेशी यांनी सहभाग घेतला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम