पाचोऱ्यात ५९ हजार मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य

बातमी शेअर करा...

पाचोऱ्यात ५९ हजार मतदार ठरवणार उमेदवारांनाच भवितव्य

पाचोरा प्रतिनिधी │ पाचोरा नगरपरिषदेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक आज (२ डिसेंबर) पार पडत असून, शहरातील एकूण ५९ हजार ८४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ६३ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्व. आर. ओ. तात्या पाटील व्यापारी भवनातून ईव्हीएम मशिन्स रवाना करण्यात आल्या. या प्रक्रियेसाठी १०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, शांततेत मतदान पार पडावे यासाठी तब्बल ३५० कर्मचाऱ्यांचा सुरक्षा बंदोबस्त तैनात आहे. प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदानाधिकारी व शिपाई मिळून ७० पथकांद्वारे व्यवस्था उभारण्यात आली आहे.

पाचोऱ्यातील मतदारसंख्या ५९ हजार ८४ असून, त्यापैकी ३० हजार ४१ पुरुष, २९ हजार ३७ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. आजच्या मतदानात नगराध्यक्ष आणि १४ प्रभागातील नगरसेवकांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे, सहनिर्णय अधिकारी व मुख्याधिकारी मंगेश देवरे आणि तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.

३ डिसेंबरला मतमोजणी; बाजार समितीसमोरील संकुलात तयारी पूर्ण

मतदानानंतर उद्या (३ डिसेंबर) कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील स्व. आर. ओ. तात्या पाटील व्यापारी संकुलात सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. १२ टेबलांवर सात फेऱ्यांमध्ये १४ प्रभागांचे मतदान टपाली मतांसह मोजले जाणार आहे.

प्रभाग ११ अ व १२ ब ची निवडणूक स्थगित; नवा कार्यक्रम घोषित

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला दोन उमेदवारांनी आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतल्यानंतर प्रभाग ११ अ आणि १२ ब येथील निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने २४ व २५ नोव्हेंबर रोजी निकाल दिल्यानंतर निवडणूक आयोगाने या दोन प्रभागांसाठी नवा कार्यक्रम जाहीर केला आहे.

प्रभाग ११ अ व १२ ब मध्ये २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २१ डिसेंबरला मतमोजणी होईल. या प्रभागांत भाजप, शिवसेना (शिंदे गट), उद्धव ठाकरे गट आणि इतर उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम