
पाटणादेवी रोडवरील टवाळखोरांचा अड्डा उद्ध्वस्त
आमदार मंगेशदादा चव्हाण यांची धडक कारवाई
पाटणादेवी रोडवरील टवाळखोरांचा अड्डा उद्ध्वस्त
आमदार मंगेशदादा चव्हाण यांची धडक कारवाई
चाळीसगाव: शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात अनधिकृत बांधकामांमध्ये चालणारा टवाळखोरांचा अड्डा अखेर उद्ध्वस्त करण्यात आला. या भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप होता. तसेच महिलांची छेडछाड, जुगार व दारूचे अड्डे यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
आज सकाळी या भागातील महिलांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन आपल्या अडचणी मांडल्या. त्यांनी टवाळखोरांचा अड्डा पाडून टाकण्याची विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तत्काळ चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. सौरभ जोशी यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर स्वतः त्या भागाला भेट देऊन पाहणी केली.
तपासणीदरम्यान अनधिकृत जागांवर चालणाऱ्या या अड्ड्यांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करत त्या जागा उद्ध्वस्त करण्यात आल्या. या धडक कारवाईमुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आमदार चव्हाण यांचा या तत्परतेबद्दल नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
“तुमचा भाऊ नेहमी तुमच्या सोबत आहे. कुठलीही अडचण आली तर मी अर्ध्या रात्रीसुद्धा तुमच्यासाठी हजर राहीन,” असे आश्वासन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिले. तसेच नगरपालिकेच्या खुल्या जागांना तार कंपाउंड करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम