
पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने वार !
पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने वार !
चौघांविरुद्ध गुन्हा
जळगाव प्रतिनिधी माझ्याकडे का पाहतो या किरकोळ कारणावरून शहरातील गांधी उद्यानाच्या गेटजवळ चौघांनी एका पाणीपुरी विक्रेत्यासह त्याच्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी, २ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली . याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास भागवत लिहेलकर (वय २७, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) आणि त्याचा भाऊ चेतन भागवत लिहेलकर हे दोघे गांधी उद्यानाच्या गेटसमोर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास संशयित जगदीश लक्ष्मण लिहलकर याने विकास लिहेलकर यांना ‘तू माझ्याकडे काय पाहतो?’ असा जाब विचारला.
या क्षुल्लक कारणावरून जगदीश लक्ष्मण लिहलकर याच्यासह यश जगदीश लिहेलकर, निलेश विनोद लिहेलकर आणि दिनेश प्रवीण लिहेलकर (सर्व रा. जळगाव) या चार जणांनी विकास लिहलकर आणि त्यांचा भाऊ चेतन लिहलकर या दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि चौघांनी मिळून दोन्ही भावांना बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी अधिकचा क्रौर्य दाखवत, कांदा कापायच्या सुरीने विकास लिहेलकर यांच्या डोक्यावर आणि हातावर वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
याबाबत विकास लिहेलकर यांनी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, रात्री चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सोनवणे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम