
पाणीप्रश्नांवर ठोस पावले; शब्दांतून कृतीकडे वाटचाल – निखिल चौधरी
पाणीप्रश्नांवर ठोस पावले; शब्दांतून कृतीकडे वाटचाल – निखिल चौधरी
अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ पूर्व भागातील दीर्घकालीन पाणीटंचाईच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असून, “शब्द नव्हे तर कृती” या भूमिकेतून काम सुरू असल्याचे नगरसेवक निखिल चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किनिकर, माजी नगराध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी तसेच शिवसेना उपशहरप्रमुख पुरुषोत्तम उगले यांच्या मार्गदर्शनाखाली आज एमजेपी कार्यालयात पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर बैठक पार पडली.

या बैठकीत अंबरनाथ पूर्वेतील खेर सेक्शन, स्टेशन परिसर, साई सेक्शन, शिवधाम, शिवबसव, हल्याचा पाडा, भीमनगर व दत्तकुठीर या भागांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या, तांत्रिक अडचणी आणि तातडीच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः खेर सेक्शन परिसरात २५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर झालेला असून, या टाकीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी व स्पष्ट सूचना संबंधित एमजेपी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बैठकीनंतर निखिल चौधरी यांनी हल्याचा पाडा परिसरात प्रत्यक्ष भेट देत नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या तक्रारी व अडचणी ऐकून एमजेपी अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, एमजेपी कार्यालयातही नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या थेट मांडल्या.
पाणीपुरवठ्याचे काम सुरू झाले असून ही कामे सातत्याने सुरूच राहणार आहेत. जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा निर्धार नगरसेवक निखिल चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम