
पातरखेडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गोवरची लागण : उपचारानंतर सर्वजण बरे होऊन घरी परतले
जळगाव, – एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथील एकविरा माता आदिवासी मुलांच्या निवासी आश्रमशाळेतील काही विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर झाली असून, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शाळा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे २४ जुलै २०२५ रोजी लागण निदर्शनास येताच तातडीने उपचार सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे दिसताच आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे हलवण्यात आले होते.
सध्या कोणत्याही विद्यार्थ्याला गोवरसदृश्य लक्षणे नाहीत आणि एकही विद्यार्थी व्हेंटिलेटरवर नव्हता, अशी माहिती संस्थेचे सचिव विजयदादा पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना काही दिवसांसाठी पालकांच्या देखरेखीखाली घरी पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी आश्रमशाळेला भेट दिली होती. गोवरची साखळी तुटावी म्हणून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याच्या मौखिक सूचना त्यांनी दिल्या.
उपचारादरम्यान दूध, फळे, नाश्ता व जेवणाची व्यवस्था संस्थेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा देत विद्यार्थ्यांची काळजी घेतली.
विद्यार्थ्यांच्या पुनरागमनानंतर गोवर प्रतिबंधक लसीकरण व नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचेही सचिव पाटील यांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम