
पारोळा-एरंडोल नगरपरिषद निवडणुकांसाठी युतीची घोषणा
पारोळा-एरंडोल नगरपरिषद निवडणुकांसाठी युतीची घोषणा
पारोळ्यात शिंदे गट, एरंडोलमध्ये भाजप मैदानात
पारोळा (प्रतिनिधी) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. पारोळा आणि एरंडोल नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देत आज पारोळा येथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) युतीची औपचारिक घोषणा करण्यात आली.
शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, “वाटाघाटीनंतर पारोळा नगरपरिषद निवडणूक शिंदे गटाच्या ताब्यात राहील, तर एरंडोल नगरपरिषद निवडणूक भारतीय जनता पक्ष लढवेल,” अशी भूमिका ठरल्याचे स्पष्ट केले. तसेच, लवकरच नगरसेवकांच्या उमेदवारीचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात येईल, असे आमदार चव्हाण यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
यावेळी शिवसेना आमदार अमोल पाटील यांनीही उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत, युती दृढ असल्याचा विश्वास व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला माजी आमदार चिमणराव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, किशोर काळसकर, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, गोविंद शिरोळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुका प्रमुख मधुकर पाटील, भाजप नेते रोहन मोरे, रवींद्र भोमा पाटील, नितीन सोनार, मनोज जगदाळे, ॲड. कृतिका आफ्रे, रेखा चौधरी, विजय पाटील, तसेच भाजप तालुका प्रमुख अतुल पवार, जिल्हा शिवसेना पदाधिकारी वासुदेव पाटील, जिजाबराव पाटील, पंडित पाटील आदींसह मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पारोळा नगरपरिषदेकरिता शिवसेना (शिंदे गट) कडून चंद्रकांत पाटील यांची, तर एरंडोल नगरपरिषदेकरिता भारतीय जनता पक्ष कडून डॉ. नरेंद्र ठाकुर यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
या घोषणेनंतर दोन्ही तालुक्यांतील राजकीय समीकरणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, युतीच्या या निर्णयामुळे विरोधकांच्या रणनितीतही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम