
पारोळा तालुक्यात विहीर खोदताना अपघात; मजुराचा दगड पडून मृत्यू
पारोळा तालुक्यात विहीर खोदताना अपघात; मजुराचा दगड पडून मृत्यू
लोणी बु. येथील घटना
पारोळा प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील लोणी बु. येथे विहीर खोदण्याचे काम सुरू असताना क्रेनच्या बकेटमधून दगड पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत मजुराचे नाव देविदास शिवाजी झेंडे (वय ३८, रा. शिंदी पिंपळगाव, ता. बदनापूर, जि. जालना) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, भगवान वामन पाटील यांच्या शेतात विहीर खोदकाम सुरू होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने बकेटमधून विहिरीतील दगड बाहेर काढत असताना एक दगड देविदास झेंडे यांच्या डोक्यावर पडला. यामुळे ते जागीच बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ विहिरीबाहेर काढून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती देविदास गायकवाड यांनी दिल्यावरून पारोळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम