
पारोळ्यात ‘हॅलो नगराध्यक्ष’ योजनेचा शुभारंभ
पारोळ्यात ‘हॅलो नगराध्यक्ष’ योजनेचा शुभारंभ
नववर्षी नागरिकांच्या थेट समस्यांसाठी नगराध्यक्षांचा पुढाकार; ८८०५१९९१०० वर संपर्काचे आवाहन
पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘हॅलो नगराध्यक्ष’ या लोकाभिमुख योजनेचा शुभारंभ केला आहे. गुरुवारी सकाळी १ जानेवारी रोजी ८८०५१९९१०० या दूरध्वनी क्रमांकाद्वारे या योजनेची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
अलीकडेच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पारोळा शहरातील मतदारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत तब्बल वीस हजारांहून अधिक मतांच्या आघाडीने त्यांना विजयी केले होते. त्यांच्या मागील कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांबरोबरच ‘हॅलो नगराध्यक्ष’ ही योजना विशेष लोकप्रिय ठरली होती. त्याच यशस्वी अनुभवाच्या जोरावर यंदाही ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत शहरातील कोणत्याही भागातील नागरिक थेट नगराध्यक्षांशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडू शकणार आहेत. आरोग्य सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्ती, नागरी सुविधा आदी विषयांवरील तक्रारींची नोंद घेतली जाईल. संबंधित समस्या तात्काळ संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे पाठवून त्या सोडविण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या जाणार असून, अंमलबजावणीवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
‘हॅलो नगराध्यक्ष’ योजनेमुळे नगरपरिषद आणि नागरिकांमधील थेट संवाद अधिक बळकट होणार असून, समस्या जलदगतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या परिसरातील अडचणी व समस्या नोंदविण्यासाठी वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, या योजनेला शहरातील विविध स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम