
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाचे कुलूप तोडून चार लाखांची सिगारेट पाकिटे लंपास ; गुन्हा दाखल
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाचे कुलूप तोडून चार लाखांची सिगारेट पाकिटे लंपास ; गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाख रुपयांच्या सिगारेटचे पाकिट चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २८ जून रोजी सकाळी उघडकीस आली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवपीठ भागातील रहिवासी चंद्रशेखर जवरीलाल राका (वय ५०) हे गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ पानटपरी चालवतात. नेहमीप्रमाणे २७ जून रोजी रात्री त्यांनी आपल्या दुकानासमोर वाहन क्रमांक एमएच १८ सीवाय ०१२३ पार्क करून त्यात सिगारेटचे सुमारे चार लाख रुपये किमतीचे पाकिट ठेवले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वाहनाचे दरवाजाचे कुलूप तोडून त्यातील सिगारेटची पाकिटे चोरून नेली.
ही घटना २८ जून रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. त्यानंतर चंद्रशेखर राका यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल पाटील करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम