
पाल येथे पाचव्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा समारोप पॉप
पाल येथे पाचव्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा समारोप
पाल | प्रतिनिधी
पाल येथे चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव यांच्या वतीने आयोजित पाचव्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. दि. २७ व २८ डिसेंबर रोजी दोन दिवस चाललेल्या या संमेलनात पक्षी अभ्यास, निसर्ग संवर्धन व जैवविविधता विषयक विविध संशोधनात्मक सत्रे, चर्चासत्रे व सादरीकरणे पार पडली.
समारोप सोहळ्यास संमेलनाध्यक्ष डॉ. विनोद भागवत, प्रमुख अतिथी मा. श्री. एम. झेड सरवर (IOFS), पुनित अग्रवाल, वन प्रशिक्षण केंद्राचे संचालक हेमंत शेवाळे, उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे पदाधिकारी, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, समन्वयक विलास महाजन तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) शीतल नगराळे (RFO) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील पक्षीवैविध्य, स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास, संवर्धनातील अडचणी तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विविध संशोधक व पक्षी अभ्यासकांनी आपले अनुभव व अभ्यास सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना वनपरीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) शीतल नगराळे यांनी उडणाऱ्या व स्थलांतरित पक्ष्यांसाठी योग्य अधिवास, निवासस्थाने व खाद्यसाखळी उपलब्ध होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. हातनूर धरण परिसरात नियोजनबद्ध संवर्धन झाल्यास भविष्यात हा परिसर रामसर साइट म्हणून विकसित होऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. केरळमधील पक्षी अभयारण्ये तसेच ओडिशातील चिलका सरोवर येथील उदाहरणांमधून संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते, असेही त्यांनी नमूद केले.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक चातक निसर्ग संवर्धन संस्था, वनविभाग नाशिक, उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था व स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले. सहभागी अभ्यासक व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या संमेलनात राज्यभरातून सुमारे १५० पक्षी अभ्यासक, संशोधक व निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. निसर्ग संवर्धनाचा संदेश देत व पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात संमेलन आयोजित करण्याचा संकल्प करत संमेलनाचा समारोप करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम