
पाळधी ते खोटेनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
पाळधी ते खोटेनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव प्रतिनिधी जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा रस्ता आर्थिक व सामाजिक विकासाचा महामार्ग ठरणार आहे. अनेक अपघात, धूळधाण आणि रहदारीच्या त्रासातून प्रवाशांना दिलासा मिळणार असून जून २०२६ पर्यंत जरी मुदत असली तरी मार्चमध्येच हा रस्ता जनतेच्या सेवेत आणण्याचा आमचा निर्धार आहे. रस्त्याच्या कामावरील ठिकठिकाणी फलक लावून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची ठेकेदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जळगाव शहरालगत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला अखेर गती मिळाली आहे. पाळधी ते खोटेनगर (५.२० किमी) तसेच कालिंका माता मंदिर ते तरसोद हायवे (३.३० किमी) असा एकूण ८.५ किमी रस्त्याच्या भव्य काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते.
हा रस्ता आतापर्यंत १० मीटर रुंदीचा होता. आता तो १५ मीटर रुंद होणार असून, त्यात १२ मीटर मजबूत काँक्रिटीकरण रस्ता व दोन्ही बाजूंना १.५ मीटर साईड पट्टे असतील. या कामासाठी केंद्र शासनाकडून तब्बल २७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
या रस्त्याच्या मंजुरीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे कामाला गती मिळाली असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हा रस्ता विकसित होणार असल्याने शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्हाला भरघोस निधी उपलब्ध करून शहराच्या विकासासाठी मदत केली आहे. या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार सरपंच विजय पाटील यांनी मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम