पुणे ॲग्री हॅकॅथॉन’चे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांच्या हस्ते संपन्न

बातमी शेअर करा...

पुणे ॲग्री हॅकॅथॉन’चे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांच्या हस्ते संपन्न

पुणे | प्रतिनिधी
शेतीला दिशा देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आणि त्याचे शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’ सारख्या उपक्रमांची गरज असून, कृषी तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करून त्याचे उत्पादन आणि बाजारात रुपांतर महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर मैदानावर झालेल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’च्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीतील वाढत्या आव्हानांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय पर्याय नाही. हॅकॅथॉनमध्ये सादर झालेले तंत्रज्ञान – जलसिंचन, फवारणी, कीड व्यवस्थापन, पीक काढणी पश्चात प्रक्रिया, रोबोटिक्स व AI – शेतकऱ्यांना फायदा देणारे ठरतील. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरण्यासाठी कृषी विभागाने इन्क्युबेशन केंद्रे स्थापन करावीत आणि बाजाराशी त्याचे जोड निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

क्लिन प्लांट’अंतर्गत महाराष्ट्रात ३ प्रादेशिक केंद्रे

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत देशभरात ९ केंद्रे उभारण्यात येणार असून, त्यातील ३ केंद्रे महाराष्ट्रात – पुणे (द्राक्ष), नागपूर (संत्रा) व सोलापूर (डाळिंब) – स्थापन केली जातील, अशी घोषणा केली. ३०० कोटींच्या निधीतून आधुनिक रोपवाटिका उभारून, दरवर्षी ८ कोटी रोगमुक्त रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, देशभरातील १६ हजार कृषी वैज्ञानिक आणि प्रयोगशील शेतकरी यांच्यात समन्वय साधून नवी कृषी क्रांती घडवता येईल. नवतंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे वाण स्वीकारावेत, असेही ते म्हणाले.

शेतीत नवसंकल्पनांना चालना देणारा उपक्रम – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हॅकॅथॉनमधील नवकल्पनांचे स्वागत करताना सांगितले की, निसर्ग बदल, वाढता खर्च व मनुष्यबळाच्या मर्यादा लक्षात घेता, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉनने या दिशेने प्रभावी पाऊल टाकले असून अशा उपक्रमांचे राज्यभरात आयोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उदयोन्मुख स्टार्टअप्स, नवउद्यमींना सन्मान

हॅकॅथॉनमध्ये कृषी यांत्रिकीकरण, मृदा व सिंचन व्यवस्थापन, पीक काढणी उत्तर तंत्रज्ञान, फर्टीगेशन, कीड नियंत्रण, कृषी अर्थशास्त्र, AI-आधारित उपाय इत्यादी विषयांवर काम करणाऱ्या स्टार्टअप्स, नवउद्यमी व प्रयोगशील शेतकऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमास देशभरातील विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी अधिकारी, संशोधक, उद्योग जगताचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व बँकिंग क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून एक लाख शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम